एकाच वेळी अनेक कामे करणाऱ्या मातांसाठी एक टीप : स्वतःबद्दल सुद्धा विचार करा
“तुम्ही काय करता?”
“मी एक सिरीयल मल्टी-टास्कर आहे. मम्म, मी उद्योजक आहे, गृहिणी आहे, आणि आई आहे, पुन्हा विद्यार्थिनी होणार आहे आणि हो फावल्या वेळात लिखाण करणारी मी एक हौशी लेखिका सुद्धा आहे.”
“हे खूप छान आहे. तुम्ही हे सगळ कसे करता?”
बऱ्याच लोकांबरोबर माझ्या संभाषणाची सुरवात बहुधा अशीच होते. मला आयुष्यात जे काही करायचे आहे त्याच्या बद्दल बोलताना मी खूप उत्साहित होते आणि मी ज्या व्यक्तीशी बोलत असते त्यांना वाटू लागते की मी नवीन पिढीची खूप छान आई आहे, जिचे सर्व गोष्टींवर नियंत्रण आहे. पण त्यांना हे माहित नाही की, मी ज्या काही गोष्टी सर्वात उत्तमरीत्या करू शकते त्यामधे संतुलन राखणे ही गोष्ट येत नाही. का? कारण मी नाही करू शकत?
हो, असे काही दिवस असतात जेव्हा मला वाटते की सर्व काही माझ्या नियंत्रणा खाली आहे आणि बस्स, घरून फोन येतो की माझ्या मुलीला ताप आला आहे, आणि माझा स्वतः वरचा ताबा सुटतो. तरुण माता अश्याच प्रकारे घडवलेल्या असतात - नवीन मातृत्वाच्या अंतःप्रेरणेने भरलेल्या. अपराधीपणाचा अंश असल्याशिवाय मातृत्व कधीच परिपूर्ण होतच नाही.
मी जे करते आहे ते माझ्या मुलीसाठी पुरेसे आहे का? मी माझ्या मुलीसोबत पुरेसा वेळ घालवते आहे का? मी एक चांगली मुलगी / सून आहे का? मी चांगली पत्नी आहे का? मी चांगली महिला बॉस आहे का? माझे ध्येय उच्च ठेवल्यामुळे मी माझे आयुष्य वाया घालवत आहे का? आणि जर या प्रश्नांचे उत्तर ‘होय’ देण्याची हिंमत माझ्याकडे आहे तर, मी एक चांगली व्यक्ती आहे का आणि माझ्यासाठी काही करते आहे का? नाही.
हेच तर आहे जे महिलांसाठी आवश्यक आहे, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी केलेच पाहिजे आणि मी तुम्हाला पुरेसा आग्रह नाही करू शकत. आपला सर्वात पहिला प्रश्न हाच असला पाहिजे. पण खेदाची बाब आहे की, हा आपल्यासाठी सर्वात शेवटचा प्रश्न असतो. मी हा धडा खूप कठीण प्रकारे शिकली आहे.
मातृत्वाची एक दुसरी बाजू आहे, ज्यासाठी तुम्हाला कोणी तयार करत नाही – प्रसूतीनंतरचे नैराश्य. होय. याचे निदान होण्यासाठी मला एक वर्ष लागले आणि यातून बाहेर पडण्यासाठी अजून काही महिने. आणि या काळात, मला इतरही कर्तव्ये पूर्ण करायची होती. कारण मी आई बनणे नाकारू शकत नव्हते किंवा व्यवसाय चालवणे सुद्धा सोडू शकत नव्हते किंवा मी ज्या गोष्टी नियमितपणे करते त्या गोष्टी करणे सुद्धा टाळू शकत नव्हते. माझ्या साठी कुठलेही विराम घेण्याचे बटण नव्हते.
नैराश्याबद्दल एक खास बाब अशी आहे की, तुम्ही जेव्हा तिऱ्हाईत असलात तर तुम्ही हे समजू शकत नाहीत की, एवढे उत्तम सामजिक जीवन असणारी आणि त्याहून उत्तम अश्या सर्व गोष्टी लाभलेली व्यक्ती नैराश्याने ग्रस्त कशी काय होऊ शकते?
अंतस्थ असल्यामुळे, या सर्व गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही. जर तुम्हाला जगापासून दूर जायला मिळाले, तुमच्या खोलीत झोपायला मिळाले तर जग उद्ध्वस्त झाले तरीही काही फरक पडत नाही. जगासाठी मी तीच व्यक्ती होते - मी काम करायची, पार्टी करायची, जेवण बनवायची आणि माझ्या कडून अपेक्षित असलेली सर्व कामे करायची. पण माझ्या स्वतःच्या मनाचा विचार केला तर, माझ्या संपूर्ण जगाचीच उलथापालथ झाली होती. मला माझ्या पतीला आणि कुटुंबातील व्यक्तींना याविषयी सांगायला एक महिना लागला कारण मी अशी व्यक्ती होती जिच्याकडे कुटुंबातील व्यक्ती समस्या घेऊन येत असत.
मला खूप दुर्बल, दुःखी, असुरक्षित, मूर्ख आणि संतप्त असल्याप्रमाणे वाटत असे. मी काही काळासाठी व्यावसायिक व्यक्तींची मदत घेतली आणि त्यांच्याकडून मी सर्वात महत्वाची गोष्ट शिकले जी आज ही माझ्या ध्यानात आहे. स्वतःबद्दल सहानभूती दाखवा. स्वतःपासून सुरवात करा. इतर सर्व जण, अगदी तुमचे मुल सुद्धा, वाट पाहू शकते. तिला अशी आई हवी आहे, जी तिच्यावर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करू शकते. जर मी स्वतःच चांगली बनू शकली नाही तर, तर मी माझ्या मुलीला सुदृढपणा आणि ममता कशी देणार?
मी जवळपास ३४ वर्षाची आहे आणि १७ वर्षाची असताना मला पीसीओडी आणि थायरॉईड असल्याचे निदान झाले होते. यात नैराश्य आणि पीएमएसची भर टाका म्हणजे तुमच्यावर अरिष्टच कोसळले आहे. आणि माझ्या बाबतीत देखील हेच झाले. मी इतकी रडले, इतकी रडले की माझ्या साऱ्या भावनाच सुन्न झाल्या. मी सर्वांपासून दूर-दूर राहू लागले. मी माझ्या अश्या मित्राशी बोलले जो अश्या परिस्थितीला सामोरा गेला होता आणि यातून बाहेर पडून तो इतरांशी या विषयावर बोलला. त्याने सुद्धा मला हेच सांगितले. सर्वात प्रथम, तू स्वतः, बाकीचे सर्व वाट पाहतील.
म्हणून, मी स्वतःविषयी विचार करायचे ठरवले, आणि माझ्या भावनिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरवात केली. मी लिखाण सुरु केले आणि मला असे आढळले की मी माझ्या सर्व नकारात्मक भावनांना चांगल्या लिखाणात बदलू शकते. मी जॉगिंग सुरु केले आणि योगा चालू केला आणि यामुळे माझे सारे जीवन बदलून गेले.
मी स्वतःसोबत वेळ घालवण्यास शिकले. ज्या गोष्टी मी करत नाही किंवा करू शकत नाही त्यांच्यासाठी नकार देण्यास मी शिकले.
आजही कधी-कधी, जेव्हा मी खूप काम करते किंवा खूप दडपण वाटते, तेव्हा मला पुन्हा ती समस्या जाणवू लागते. पण, मी कसे तरी यातून बाहेर पडण्याचा मार्ग शिकली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग होता - की मला एकच आयुष्य मिळाले आहे, मर्यादित दिवस आहेत आणि स्वप्ने मात्र अमर्यादित आहेत, आणि एकच व्यक्ती आहे जी ही स्वप्ने पूर्ण करू शकते किंवा त्यांचा विचार सोडून देऊ शकते, आणि ती व्यक्ती आहे मी.
हा माझा निर्णय होता. एकतर मी माझी सर्वोत्कृष्ट आवृत्ती बनू शकते किंवा साधारण बनण्यावरच समाधान मानू शकते. तुम्ही ठरवायचे की, तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता. असे काही दिवस होते की, मला वाटायचे की, मी डोंगर सुद्धा हलवू शकेन आणि असेही काही दिवस होते की, मी पलंगातून बाहेर देखील पडू शकत नव्हते. दोन्ही परिस्थितीत मी हाच निर्णय घेतला. मी पुढे जाणे निवडले. आणि जो पर्यंत माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मी थांबणार नाही.