“मी माझ्या बहिणीला कमजोर समजत होते, पण मी चुकीची होते”
मोठे होताना, मला नेहमी वाटत असे की मी माझी जुळी बहिण मोनिका पेक्षा अधिक सरस आहे. मला नेहमी तिच्यापेक्षा जास्त गुण मिळत, तिच्यापेक्षा जास्त मैत्रिणी होत्या आणि मी तिच्याआधी करिअर मध्ये उतरण्याचे ठरवले. मला अजूनही आठवते की, मी शाळेत आणि संपूर्ण कॉलेज जीवनात कसे तिचे संरक्षण केले, कारण मला वाटत असे की ती अधिक कमजोर आहे आणि स्वतःची लढाई लढू शकत नाही.
काही वर्षांनंतरच मला कळाले की, मी किती चुकीची आहे. काही वर्षांनंतरच मी तिची ताकद आणि तिच्यातील शूर व्यक्तिमत्वाला पहिले.
२०१५ सालचा ऑक्टोबर महिना होता, तेव्हा मला तिचा फोन आला. जेव्हा मला तिच्याकडून ती बातमी कळली, तेव्हा मी मटकन खुर्चीत बसली. आणि तरीही पलीकडून, एक स्पष्ट आवाज मला सर्वात वाईट बातमी देत होता ज्याची मी कधी अपेक्षा किंवा कल्पना देखील केली नव्हती, खंबीर आणि स्थिर. “ठीक आहे, माझे रिपोर्ट आले आहेत. मला ल्युकेमिया आहे.” तिने विचलित न होता सांगितले.
“काय?”, माझा आवाजात कंप होता पण ती मात्र मला धीराने सांगत होती की तिला अॅक्यूट मायलॉईड ल्युकेमिया होता, ज्यावर ताबा मिळवता येऊ शकतो आणि केमोथेरपीच्या सहाय्याने ती बरी होऊ शकते. मला तिच्यावर विश्वास होता. मला मोनिका कडून एवढ्या धैर्याची अपेक्षा नव्हती पण जर ती एवढ्या शांतपणे बोलत असेल तर मला खात्री वाटली की तिचा कर्करोग बरा होऊ शकेल.
तिच्या उपचारांदरम्यान, अडचणींना संधीमध्ये बदलण्याची तिची ताकद मी अनुभवली.
तिने केमोथेरपी घेतली आणि रीमिशनचा स्तर प्राप्त केला. पण दुर्दैवाने, पाचच महिन्यात तो राक्षस पुन्हा जागा झाला आणि या खेपेस अधिक आक्रमक रूप धारण केले. बोनमॅरो ट्रान्सप्लांट हा एकच उपाय उरला होता आणि डॉक्टरांना देखील आशा नव्हती. तरीही आम्ही ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये माझ्या स्टेम सेल्स तिच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आल्या.
तिच्या उपचारांदरम्यान, इतर कर्करोग योद्ध्यांप्रमाणे, तिने देखील स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. पण जेव्हा-जेव्हा आशा मिळवण्यासाठी ती इंटरनेटकडे वळली, तेव्हा तिला फक्त भयंकर रोगनिदान आणि रोगासमोर शरण जाणाऱ्या लोकांच्या निराशाजनक केस स्टडीजच पहायला मिळाल्या; कर्करोगाच्या रुग्णासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक यशस्वी उदाहरण सुद्धा आशेचा किरण ठरते.
हे निराशाजनक होते की तिला आशा देईल असा एकही शब्द तिथे नव्हता. पण बऱ्याचदा अडचणींच्या गर्भातूनच प्रेरणादायी कल्पना उदयाला येतात. तिने भीतीऐवजी आशेचा आसरा घेण्याचे ठरवले.
जगण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मोनिकाने स्वतःच्या बोनमॅरो ट्रान्सप्लांट आयसीयू तर्फे एक व्यासपीठ तयार केले, ज्यामुळे रोगांशी झगडून त्यावर मात मिळवलेल्या व्यक्तींच्या सत्य घटनांच्या सहाय्याने, कर्करोगाने पिडीत असलेल्या व्यक्तींना आशा मिळण्यात मदत होईल. तिने स्ट्राँगर दॅन कॅन्सर ही वेबसाईट सुरु केली, याचा उद्देश्य आहे कर्करोगाशी लढणाऱ्या लाखो शूरवीरांना सामना करावी लागणारी दरी आशेने भरून टाकायची, ज्यामुळे त्यांना विश्वास वाटेल की कर्करोग बरा होऊ शकतो.
हा प्रघात मोडण्यासाठी, तिने कर्करोगांवर विजय मिळवलेल्या अद्भुत शूरवीरांच्या खऱ्या घटना जगासमोर आणायच्या ठरवल्या आणि प्रत्येक कर्करोगाच्या रुग्णाला रोगाविरुद्ध लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी प्रेरणा द्यायचे ठरवले. आजपर्यंत, स्ट्राँगर दॅन कॅन्सर ने धैर्य आणि दृढनिश्चयाच्या अनेक कहाण्या जगासमोर आणल्या आहेत आणि कर्करोगाचा स्पर्श झालेल्या प्रत्येक व्यक्तीला विजयाच्या हृदयद्रावक आणि प्रेरणादायी गोष्टी सांगून धैर्य दिले आहे.
जरी, मोनिका कर्करोगाशी लढत असली, तरीही खूप हिमतीने लढा देत आहे. तिचे डॉक्टर तिला निग्रही म्हणतात. तिने तिच्या सकारात्मक वृत्ती, डॉक्टरांवरील विश्वास आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली यांच्या सहाय्याने या रोगावर नियंत्रण ठेवले आहे. आज, मला एक गोष्ट खात्रीने माहित आहे. ती माझ्यापेक्षा खूप जास्त खंबीर, हुशार आणि अधिक जास्त निश्चयी आहे. ती माझी प्रेरणा आहे आणि माझ्या सुखाचे कारण आहे.
हे स्ट्राँगर दॅन कॅन्सर च्या सह-संस्थापिका आणि कथा संपादक, सोनिका बक्शी यांनी लिहिलेले वैयक्तिक कथानक आहे. माजी टीव्ही पत्रकार आणि पूर्णवेळ जनसंपर्क व्यायसायिक असलेल्या सोनिका बक्शींना प्रवास करणे अतिशय आवडते. त्या होतकरू मॅरेथॉन खेळाडू आहेत, ज्यांना लिखाण आणि वचन यांची आवड आहे.
*२२ ऑगस्ट रोजी मोनिका कर्करोशी लढाई हरली, परंतु आयुष्य पूर्णपणे जगण्यात मात्र ती यशस्वी झाली. शीरोज मधील सर्वांना तुझी खूप आठवण येईल, मोनिका. तुझ्या आत्म्याला शांती लाभो हीच इच्छा.